टाटा उद्योगसमूह हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मुंबईत मुख्यालय असलेला भारतीय उद्योगसमूह आहे. हा भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी उद्योगसमूहांपैकी एक आहे. बाजार भांडवल आणि महसुलाचा विचार करता भारतातील हा आघाडीचा समूह आहे रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा आणि आतिथ्य या क्षेत्रांत या समूहातील कंपन्या प्रामुख्याने आघाडीवर आहेत. सहा खंडांतील ८०हून अधिक देशांत समुहाचे कामकाज विस्तारले आहे. उद्योगसमूहाचा इतिहास समुहाची सुरुवात १८६८ मध्ये झाली. ब्रिटिश काळात जमशेटजी नसरवानजी टाटा यांनी कापसाचे व्यवहार करणारी कंपनी त्यावेळी स्थापन केली. त्यानंतर नागपूरमध्ये १८७७ मध्ये एम्प्रेस मिल्स स्थापन झाली. समूहाने मुंबईत १९०३ मध्ये ताजमहाल हॉटेल सुरू केले. १९०४ मध्ये जमशेटजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र दोराब टाटा समूहाचे चेअरमन झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली समुहाने पोलादनिर्मिती आणि जल विद्युतनिर्मिती प्रकल्प सुरू केले. सर दोराब टाटा यांच्या मृत्यूनंतर १९३४ मध्ये नवरोजी सकलातवाला यांनी पुढची सुमारे चार वर्षे समुहाची धुरा वाहिली. १९३८ मध्ये जहांगीर रतनजी दादाभाई अर्थात जेआरडी टाटा हे या समुहाचे चेअरमन झाले. त्यांनी समुहाचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. टाटा केमिकल्स, टेल्को (आता टाटा मोटर्स), टाटा इंडस्ट्रीज, टाटा टी, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस आणि टायटन इंडस्ट्रीज ही या काळात सुरू झालेल्या काही महत्त्वाच्या कंपन्यांची नावे होत. सध्याचे उद्योगसमुहाचे चेअरमन रतन टाटा यांनी जेआरडींकडून १९९१ मध्ये सूत्रे स्वीकारली.